बुधवार, २१ डिसेंबर, २०११

माझी शेरोशायरी....विनोद / 1

१.
आमुच्या मांडीवरी, बाळ आहे बैसला
नंदपत्नीच्या जसा, कृष्ण होता बैसला
बाळमुखी त्याचिया, विश्व तिने पाहिले
बाळमुखीं, हाय! आम्ही, दात किडके पाहिले

२.
पहिलीस मुलगा जाहला, ती जाहली वेडीखुळी
दुसरीस मुलगा जाहला, आधीच होती ती खुळी

३.
पंचांग अवघे पिंजुनी, सुमुहूर्त आम्ही पाहिले
हाय! आता ना कळे, कोण्या मुहूर्तीं पाहिले

४. मांजरीला पाहुनी, तो म्हणाला- ‘शू:! हुशा!’
थबकली आनंदुनी, समजुनी ती- ‘शू:! उषा!’

५.
‘सावळ्या केसात आहे तारुण्य-’ ऎसे वाचुनी
‘पांढ~या केसात आहे-’ ऎसेहि पुढती वाचुनी
चमकलो आम्ही जरासे, आश्चर्य थोडे वाटले
नुसतेच ना आश्चर्य थोडे, वाईटसुद्धा वाटले-
तारुण्य ना आम्हाकडे, वार्धक्यही नाही तसे
डोईवरि या आमुच्या, टक्कल आहे –हे असे!
तरुण ना म्हणणार कोणी आम्हास, आहे हे खरे
वृद्धही तैसेच कोणी म्हणणार ना, हेही खरे!

६.
आज आहे नाभिकाचा, मस्त धंदा चालला
पुरुषांसवे स्त्रियाहि आता, केस कापू लागल्या
पाहतो नाभिक आता, शुभदिनाची वाट त्या-
पुरुषांसवे दाढी कराया, केव्हा आता येतील त्या?

७.
संवय होती खूप पुराणी, घ्यावयाचा ‘इव्हनिंग वाक”
आणिला टी. व्ही. घरी अन संवय गेली जळून खाक!!

(रोहिणी-पुणे/सप्टेंबर/ १९८७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा